Advertisement

शिंदे-पवार-फडणवीस-पंकजा एकाच हेलिकॅप्टर मधून गोपीनाथ गडावर दाखल

प्रजापत्र | Tuesday, 05/12/2023
बातमी शेअर करा

परळी-  आज होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी नांदेड विमानतळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपा नेत्या पंकजा मुंडे या एकाच हेलिकॉप्टरमधून परळीतल्या गोपीनाथ गडावर डेरेदाखल झाल्या आहेत. त्या परळीतील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमालाही हजेरी लावणार असून मुंडे बंधू-भगिनी सत्तांतरानंतर प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. दुसरीकडे आयोजीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली आहे. तत्पूर्वी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाच्या मंदिरात जावून दर्शन घेतले.

 

 

 

   परळी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज होत असून कार्यक्रमासाठी ५० हजारापेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती दर्शविली आहे. परळी आज गजबजली असून कार्यक्रमस्थळ जिल्हाभरातील नागरिकांनी खचाखच भरून गेले आहे. आज सकाळीच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास नांदेड विमानतळावरून हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे या एकाच हेलिकॉप्टरमधून परळीतल्या गोपीनाथ गडावर डेरेदाखल झाल्या. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा व धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जात तिथे पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

 

 

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व. गोपीनाथराव यांच्यासोबत आमचे जुनेच ऋणानुबंध असल्याचे म्हटले. या वेळी पंकजा यांनी शिंदे, पवार आणि फडणवीस यांचे स्वागत केले. पुढे शासनाचा काफिला कार्यक्रमस्थळाकडे रवाना होत आहे. हजारो कोटी रुपयांच्या कामाचे शुभारंभ आणि उद्घाटन आज होणार असून या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने लोक परळीत डेरेदाखल आहेत.

Advertisement

Advertisement