Advertisement

संपादकीय अग्रलेख -चक्रव्यूहात अर्थकारण

प्रजापत्र | Thursday, 23/11/2023
बातमी शेअर करा

 जास्त व्याजाचा मोह, आणि अगदी सध्या साध्या अफवांवरून डगमगणारा विश्वास, त्यातच पुन्हा आर्थिक साक्षरतेच्या नावाने असलेली बोंब आणि काही प्रमाणात वित्तीय क्षेत्रात घुसलेल्या अपप्रवृत्ती, या साऱ्यांचा परिणाम म्हणून मागच्या काही काळात वित्तीय संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशा वित्तीय संस्था कोसळत आहेत आणि त्याचे परिणाम मात्र एकंदरीतच अर्थव्यवस्थेला भोगावे लागत आहेत, लागणार आहेत. बँक , पतसंस्था आणि अगदी मल्टीस्टेट देखील,यांचे अर्थकारणातले योगदान मोठे आहे, त्यामुळे अफवा, अविश्वास आणि काहीसे गैरव्यवस्थापन यांच्या चक्रव्यूहात या संस्थांचा 'अभिमन्यू' होणे कोणालाच परवडणारे नाही .

 

     बीड जिल्ह्यातील काही मल्टीस्टेट मागच्या काही काळात अडचणीत आल्या. आणि त्यामुळे आता मल्टीस्टेटच काय पतसंस्था आणि अगदी नागरी  बँकांना देखील धास्ती वाटावी अशी असुरक्षितता बँकिंग विश्वात निर्माण झालेली आहे. जरा काही झाले की कोणत्या वित्तीय संस्थेसमोर ठेवीदारांच्या रांगा लागतील हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या वित्तियसंस्था बंद पडल्या आहेत, त्यामध्ये सामान्यांचे हजारो कोटी अडकून पडले आहेत. एकट्या बीड जिल्ह्याचा वेगवेगळ्या वित्तियसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवींचा आकडा हजार कोटीच्या पुढे सहज जाईल अशी परिस्थिती आहे. या वित्तियसंस्थांसमोर संकटे आली नसती तर आज यातील बराच पैसे चलनात आला असता, किमान त्याच्या भरवश्यावर बाजारपेठेत व्यवहार झाले असते. आज ते सारे ठप्प पडले आहे.

 

     मुळात बीडसारख्या जिल्ह्यात जेथे अगदी आजसुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंगचे जाळे पुरेसे नाही, त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रातील बँकिंग व्यवसायानेच जिल्ह्याला 'पत' मिळवून दिली आहे. जिल्ह्यातील अनेक उद्योग उभा राहिले ते या सहकार क्षेत्रातील बँकिंगच्याच पाठबळावर. मग यात नागरी बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अर्थातच मल्टिस्टेटचा देखील मोठा वाटा राहिलेला आहे हे नाकारून चालणार नाही. ज्यावेळी सामान्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कोणी उभे करीत नव्हते त्यावेळी या 'स्थानिक' वित्तीय संस्थांनीच त्या सामान्यांना मदत केली हे देखील वास्तव आहे.  म्हणूनच आज महाराष्टात बीड जिल्ह्यात सर्वाधिक संख्येने मल्टीस्टेट आहेत. पूर्वी सर्वाधिक पतसंस्था असणारा जिल्हा बीडचा होता. आज ज्यांचे रूपांतर मल्टीस्टेटमध्ये झाले आहे, त्यातील बव्हंशी संस्था या पूर्वाश्रमीच्या पतसंस्था होत्या. जसे या संस्थांनी सामान्यांना पत दिली तसेच या संस्थांच्या मागे देखील लोकांनी विश्वासाचे बळ उभे केले. साधी साधी पतसंस्था किंवा मल्टीस्टेट अगदी सहज शंभर,पाचशे,हजार कोटीच्या ठेवींचा पल्ला ओलांडते हे सामान्यांच्या विश्वासाचेच द्योतक आहे.

 

     मुळात बँकिंग चालते ती विश्वास आणि व्यवस्थापन या दोन चाकांवर.कोणत्यीही वित्तीय संस्था असेल, त्यांनी ठेवीदारांच्या ठेवी घेऊन त्या कर्ज स्वरूपात वाटलेल्या असतात. साधारण ६० ते ७० % ठेवी कर्ज स्वरूपात वाटल्या तर त्या संस्थेच्या हातात ३० -४० टक्केच रक्कम राहते. त्यातही रोजचे व्यवहार असतातच,आणि म्हणूनच एखाद्या संस्थेत सर्वच ठेवीदार एकाचवेळी 'आम्हाला आताच ठेवी द्या' म्हणू लागले तर ते कोणालाच शक्य होणार नाही. आणि मग काही लोकांना पैसे मिळाले नाहीत,की लगेच संस्था बुडाली अशी जी अफवा पसरते आणि मग लगेच लांबच्या लांब रांगा लागतात, त्याचा फटका बसून वित्तीय संस्था कोसळत आहेत. याचा अर्थ त्या संस्थांच्या बाबतीत ग्राहकांनी दुर्लक्ष करावे असे नाही. मात्र मुळात ज्यावेळी एखाद्या वित्तीय संस्थेत ठेवी ठेवल्या जातात , त्यावेळी त्या संस्थेच्या प्रमुखांच्या विश्वासावरच ठेवल्या जातात,मग एखाद्या गोष्टीने त्या विश्वासाला धक्का कसा बसू शकतो? तसेच ठेवी ठेवताना ग्राहक काय पाहतो हे देखील महत्वाचे आहेच, सदर संस्थेचे व्यवस्थापन कसे आहे? त्यांचे कर्ज वाटप कोणाला होते? कर्ज वाटप पारदर्शी आहे का? संस्था कर्ज वाटपावर व्यवसाय करते की गुंतवणुकीवर? आदी बाबी ठेवीदारांनी पाहिल्या पाहिजेत. आथिर्क साक्षरता म्हणतात ते यालाच. आणि हे सारे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत वित्तीय संस्थांभोवतीचे अविश्वासाचे वादळ कमी होणार नाही.
 

Advertisement

Advertisement