बीड- यावर्षी पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. शेत शिवार पाण्याअभावी सुकून गेले आहेत. सोयाबीनची वाढ खुंटली आहे. कापूस जळाला असून इतर पिके ही कोमजली असताना आता बळीराजासाठी खुशखबर असल्याचे हवामान विभागाच्या माहितीतून समोर येत आहे.मागच्या दोन दिवसात जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असताना आता पुढील ४८ तासात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून आज बीडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. मागील महिन्यात हवामान खात्याकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सर्वत्र पडेल असे सांगितल्या प्रमाणे पावसाने राज्यात आणि जिल्ह्यात रिमझिम स्वरूपात हजेरी लावली आहे. त्यात मागच्या दोन दिवसांत पावसाच्या सरी सर्वत्र कोसळल्या.आता पुन्हा एकदा पाऊस जोर 'धार' हजेरी लावणार असल्याने शेतकऱ्यांना हा दिलासा मानला जात आहे.