अंबाजोगाई: शहरातील सदर बाजार नाका परिसरातील एका इमारतीच्या तळमजल्यावर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या 'फन टार्गेट' नावाच्या ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या विशेष पथकाने शनिवारी (दि.०३ जानेवारी) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली. या मोहिमेत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून संगणक संच आणि रोख रकमेसह एकूण ५४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना सदर बाजार नाका येथील आर. एन. बिल्डिंगच्या तळमजल्यात अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री पटल्यानंतर शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने सलमान चहाच्या हॉटेल शेजारी असलेल्या या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी परवेज शेख मोईज आणि मोहीद रशीद खान हे दोघे संगणकावर ऑनलाइन बिंगो जुगार खेळत आणि खेळवत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ७,७३० आणि ५,९७० अशी एकूण १३,७०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. तसेच पीसी, मॉनिटर, की-बोर्ड आणि एलसीडी टीव्ही असे जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पकडण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता, हा जुगार अड्डा अंबाजोगाई येथील वाजेद सय्यद आणि आसिफ पठाण यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सतीश कांगणे, पोलीस हवालदार घोळवे, शेख आणि पोलीस अंमलदार नागरगोजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून परवेज शेख मोईज, मोहीद रशीद खान, वाजेद सय्यद आणि आसिफ पठाण यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

