समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोच समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १७ कामागारांचा जीव गेला आहे. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी?
शहापूरजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु होतं. त्यावेळी गर्डर लाँचिंग करत असताना तो कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्याबाबत आम्ही आता अधिकारी, पालकमंत्री हे त्या ठिकाणी पोहचले आहेत. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. सित्झर्लंडची कंपनी काम करत होती. मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. तसंच हा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल आणि कारवाईही केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.