Advertisement

आष्टीत पुन्हा बिबट्याची दहशत

प्रजापत्र | Friday, 30/06/2023
बातमी शेअर करा

 

प्रविण पोकळे  
आष्टी-मागील तीन वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यात एका नरसंहार बिबट्याने धुमाकूळ घातला होता.यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे राज्यभरातील उत्कृष्ट कर्मचारी आले होते.१५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तो बिबट्या जेरबंद झाला होता.आता पुन्हा एकदा आष्टी तालुक्यात एका बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केल्याचे समोर आले आहे.पांगरा चांदणी शिवार,दराडे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा फाडला.त्यानंतर रामनाथ मिसाळ या शेतकऱ्यांच्या विहिरीत काल रात्रभर तो अडकला होता.आज (दि.३०) सकाळी वन विभागाचे कर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेले मात्र हा बिबट्या या कर्मचाऱ्यांच्या तावडीतून निसटल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 

           आष्टी तालुक्यात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असते.गुरुवारी (दि.२९) दराडे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्यांचा एका बिबट्याने फडशा फाडला.त्यानंतर रात्री उशिरा अंधार असल्याने तो रामनाथ मिसाळ यांच्या एका विहिरीत पडला होता.रात्रीतून ही वार्ता सर्वत्र पसरली.आज सकाळी वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विहिरीवर पूर्ण बंदोबस्तात आले.मात्र बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात न येता विहिरीतील पाईपाचा आधार घेऊन बाहेर आला अन वन विभागाच्या तावडीतून निसटला.दरम्यान या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लीक करा   

Advertisement

Advertisement