Advertisement

गेवराई तालुक्यातील अनेक मोसंबी उत्पादक चिंतेत

प्रजापत्र | Thursday, 25/05/2023
बातमी शेअर करा

गेवराई - तालुक्यातील तलवाडा परिसरात अनेक मोसंबी उत्पादक चिंतेत आहेत. लागवडीनंतर मोसंबी झाडांना फळधारणा तर झाली मात्र फळाची वाढ झाली नाही, त्यातच रोगामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली. विविध उपाययोजना करुनही उत्पन्न मिळत नसल्याने  आणि विम्याचं कवचही नसल्याने कुणी पाच एकर तर कुणी दहा एकर अशा शंभर एकरावरच्या मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवल्याचं शेतकरी सांगतात. 

तलवाडा गावच्या अकरम शेख यांची तीन वर्षांपूर्वी पाच एकरामध्ये या बागेची लागवड  केली.  त्यावर सहा लाख रुपये खर्च झाला मात्र यातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी या संपूर्ण पाच एकरच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवला आहे. मोसंबी बागावर पडत असलेले नवनवीन रोग आणि शासनाकडून मिळत नसलेला पिक विमा त्यामुळे ही बाग जोपासायची काशी असा प्रश्न त्यांना पडला होता.

 

दहा एकरावरच्या मोसंबीवर कुऱ्हाड
गेवराई तालुक्यातल्या ही फक्त  एका शेतकऱ्याची परिस्थिती नाही तर राहेरी गावच्या कृष्णा लाड यांनी एका वर्षात दहा एकरावरची मोसंबी तोडून अशी बांधावर टाकली आहे. उच्च दर्जाच्या मोसंबीच्या रोपाची त्यांनी लागवड केली होती. त्यासाठी ठिबकची व्यवस्था केली जाणार आणि यातून 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना होती.  मात्र अचानक मोसंबी पिवळी पडू लागली. पदरचा खर्च करून बाग जोपासायची कशी त्यामुळे त्यांनी दहा एकरावरच्या मोसंबीवर कुऱ्हाड चालवली. 

मुबलक पाण्यावर आधुनिक शेती करावी म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागाची निवड केली. मात्र लागवडीनंतर या झाडांना फळधारणा तर झाली. फळाची वाढ झाली नाही आणि त्यातच फळांवर पडणारा काळा डागाचा रोग यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागल्याने शंभर एकरावरच्या मोसंबीच्या बागा शेतकऱ्यांनी तोडून टाकल्या आहेत.

 

 

मोसंबीच्या बागा देखील शेतकरी आता तोडण्याच्या तयारीत
गेल्या तीन वर्षापासून मोसंबी फळबागाला शासनाकडून कुठल्याच प्रकारचा पिक विमा मिळत नाही तर नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई देखील मिळत नाही. काही शेतकऱ्यांनी नव्याने लागवड केलेल्या बागा देखील तोडायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे फळांवर पडणारा काळ्या डागाचा रोग आणि झाड पिवळी पडत असल्याने यावर कुठल्याही औषधाचा परिणाम होताना दिसत नाही.  त्यामुळे शिल्लक राहिलेल्या मोसंबीच्या बागा देखील शेतकरी आता तोडण्याच्या तयारीत आहेत.

 

 

मोसंबीच्या 'या' भागावर पहिल्यांदा कीड रोगीचा प्रादुर्भाव
मोसंबीच्या या भागावर काही पहिल्यांदा कीड रोगीचा प्रादुर्भाव झाले असे नाही. मात्र किमान यापूर्वी महागडी औषध फवारणी करून त्या कीड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य होते. मात्र आता मोसंबीला भाव मिळत नाही आणि विम्याचे कवच नाही म्हणून या शेतकऱ्यांनी आता मोसंबीच्या शेतीपासून फारकत घेतली असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही

Advertisement

Advertisement