ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दीपक सावंत हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दरम्यान त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला भगदाड पडण्याची शक्यता नाकारत येत नाही. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश करत असल्याची घोषणा करत मोठा धक्का दिला होता.
दीपक सावंत यांच्या निमित्ताने शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे पोहोचणार आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे.
दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.