धाराशिव - उमरगा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या डॉ. आर. डी. शेंडगे यास तत्काळ अटक करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या वार्तालापमध्ये प्रसन्ना यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीबाबत तसेच विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची प्रमुख उपस्थिती होती.
रुग्णांसह शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे सर्वेसर्वा डॉ. आर. डी. शेंडगे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार होते. नंतर बनसोडे हा पोलिसांना शरण आला होता. तर शेंडगे हे अद्याप फरार आहेत.
बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ. आर. डी. शेंडगे यांच्यासह तत्कालीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ. शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती. त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेंडगे हे फरार आहेत. मागील काही दिवसांपासून शेंडगे उमरगा परिसरात बिनदिक्कतपणे फिरत होते. परंतु त्यांना अटक करण्यात पोलिसांचे प्रयत्न कमी पडत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान प्रसन्ना यांच्या आदेशामुळे त्यांना अटक होणार का? याकडे लक्ष लागले आहे.