पुणे पोटनिवडणुकीसोबतच देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आज जाहीर होत आहेत. काही जागांचे निकाल हाती आले आहेत, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरु आहे. अशातच नागालँडमधील दोन जागांवर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर रामदास आठवले यांच्या आरपीआयचे आमदार निवडून आले आहेत.
ईशान्येकडील तीन राज्य मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. तिनही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी, तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं.
'या' दोन जागांवर आरपीआयच्या उमेदवारांचा विजय
रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत. RPI (आठवले) च्या Y. लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा जिंकली आहे. तर इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-II ही जागा जिंकली आहे.
मागील निकाल कसा होता?
नागालँडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच, 2018 च्या निवडणुकीत NPF ने 26 जागा जिंकल्या होत्या. एनडीपीपीला 17 जागा मिळाल्या होत्या. भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. बाकीच्या जागा इतरांनी जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र गेल्या निवडणुकीत खातंही उघडता आलं नव्हतं. 2018 च्या निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने प्रथमच विजय मिळवला होता. 35 जागांवर भाजपने विजयाचा झेंडा फडकवला होता. सीपीएमच्या खात्यात 16 जागा आल्या होत्या. तर आयपीएफटीला 8 जागा मिळाल्या होत्या. तर त्रिपुरामध्ये काँग्रेसला मात्र खातंही उघडता आलं नव्हतं.
नागालँडचं राजकीय समीकरण
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार आहे आणि नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. एनडीपीपी, भाजप, एनपीपी यांचा सरकारमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीच एनडीपीपी आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एनडीपीपी 40 जागा आणि भाजप 20 जागांवर एकत्र लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.