नवी दिल्ली दि.28 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक निरीक्षण नोंदविले आहे. आजच्या घडीला हे केवळ न्यायालयाचे निरीक्षण असले तरी यामुळे शिंदे गटाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘ज्यावेळी आघाडी सरकारमधील एखाद्या पक्षाचे काही आमदार आघाडीला विरोध करतात त्यावेळी हे अपात्रतेचे लक्षण असते’ असे निरीक्षण सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचुड यांनी नोंदविले आहे. यामुळे या प्रकरणातील निकालाचे चित्रच बदलू शकते अशी परिस्थिती आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पिठासमोर सुनावणी सुरू आहे. मंगळवारच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तीवाद झाल्यानंतर शिंदे गटाकडून निरज कौल यांनी युक्तीवाद केला. शिवसेना पक्षात फुट पडलेली नाही तर सरकार मधल्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी तत्कालीन आघाडीला विरोध केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी फुटीला मंजुरी दिली असा ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा असल्याचे निरज कौल सांगत होते. त्यावेळी सरन्यायाधिश डी.वाय.चंद्रचुड यांनी अनेक मुद्यांवर स्पष्टीकरण मागितले. त्याच दरम्यान अपात्रतेच्या संदर्भाने भाष्य करताना ‘जेव्हा एखादे सरकार स्थापन होते त्यावेळी त्या सरकारमधील एखाद्या पक्षाच्या आमदाराच्या गटाला आम्ही आघाडी सोबत नाहीत असे म्हणता येत नाही. तसे झाल्यास त्यावर अपात्रतेच्या तरतुदी लागू होवू शकतात. तुम्ही व्हिपने प्रतिबंधीत आहात. जोपर्यंत दुसर्या एखाद्या पक्षात त्या आमदारांचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत मुळ पक्षाचा व्हिप लागू असतो.’ असे स्पष्ट निरीक्षण सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचुड यांनी नोंदविले आहे. सरन्यायाधिशांचे हे निरीक्षण शिंदे गटासाठी मोठा धक्का असू शकतो.