दिल्ली स्थित एका न्यायालयाने सोमवारी दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची CBI कोठडी सुनावली. त्यामुळे आता ते 4 मार्चपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात राहतील. सिसोदियांना सोमवारी दुपारी 3.10 वा. राउज अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले होते. तिथे जवळपास 30 मिनिटे सुनावणी झाली. त्यात तपास संस्थेने सिसोदियांची 5 दिवसांची कोठडी मागितली. कोर्टाने ती मान्य केली.
सीबीआयने रविवारी सलग 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदिया यांना अटक केली. सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे.सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे.
जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.