Advertisement

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींत गँगवॉर

प्रजापत्र | Sunday, 26/02/2023
बातमी शेअर करा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या 2 गुंडांची गोइंदवाल तुरुंगात हत्या झाली आहे. रविवारी तुरुंगात गँगवॉर अर्थात टोळीयुद्ध झाले. त्यात मनदीप सिंग तुफान व मनमोहन सिंग मोहना यांचा मृत्यू झाला. तर केशव गंभीर जखमी झाला. या तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तरनतारणचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगजीत सिंग यांनी सांगितले की, तुरुंगातून आणलेल्या 3 जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला. तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

 

कैद्यांसोबतच्या वादातून घटना
यासंबंधीच्या वृत्तानुसार, गँगस्टर मनदीप सिंग तुफानचा तुरुंगातील इतर कैद्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर कैद्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या केली. या घटनेत इतर 3 ते 4 कैदी जखमी झाल्याचे वृत्त आहे. गँगस्टर मनदीप तुफान हा जग्गू भगवानपुरिया गँगचा सदस्य आहे.

 

मुसेवाला हत्याकांडात मनदीप तुफान स्टँडबाय शूटर होता
सिद्धू मुसेवाला हत्याकांड घडले त्या दिवशी मनदीप तुफानही घटनास्थळी उपस्थित होता. गोल्डी ब्रारने जग्गू भगवानपुरियाचा खास मनदीप तुफानसह मणी रईयाला स्टँडबायवर ठेवले होते. त्यांना जगरूप उर्फ रूपा व मनप्रीत मन्नुला कव्हर देण्याच्या सूचना होत्या. जग्गू भगवानपुरियाच्या चौकशीत मनदीप तुफानचे नाव समोर आले होते.

 

 

घटनेनंतर अंडरग्राउंड झाले होते
घटनेनंतर हे दोन्ही आरोपी लुधियानाच्या संदीपसोबत अंडरग्राउंड झाले होते. संदीपने दोन्ही आरोपींना लुधियानातील आपल्या एका नातेवाईकाच्या घरात आश्रय दिला होता. ते तिथे अनेक दिवस राहिले होते. काही दिवस लुधियानात राहिल्यानंतर दोन्ही गँगस्टर मनदीप तुफान व मणी लुधियानातून निघून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली होती.

 

 

भटिंडाच्या पेट्रोल पंपावर सीसीटीव्हीत दिसला होता तुफान
येथूनच आरोपींना संदीपने अमृतसरचे घोडे व्यापारी सतबीर याच्या फॉर्च्युनरमध्ये शस्त्र देऊन भटिंडाला मुसेवालाच्या हत्येसाठी पाठवले होते. भटिंडाच्या एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी दिसून आले होते. त्यामुळे आरोपींना सतबीरनेच भटिंडापर्यंत आणल्याचे स्पष्ट झाले होते.
संदीपने मानसात 3 शूटर पाठवले होते. त्याने पोलिसांना या शूटर्सपैकी मणी रईया व तुफानचे नाव सांगितले. पण तिसरा आरोपी अजून फरार आहे. तसेच त्याची ओळखही पटली नाही. तरनतारण पोलिस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

लुधियानामध्येही गुन्हा दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लुधियानात मनदीप सिंग तुफान व मणि रईया नामक गुंडांवर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही गुंड यापूर्वी अटक करण्यात आलेल्या संदीप काहलॉनचे निकटवर्तीय आहेत. सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी गुंड मनदीप सिंग तुफान व मणि रईया यांनी त्याच्या घराची 10 दिवस रेकी केली होती. त्याची माहिती त्याने कॅनडात बसलेल्या गोल्डी ब्रारला दिली होती. त्यानंतर सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा संपूर्ण कट रचण्यात आला होता.

 

 

केशवची हरियाणाच्या शूटर्सना पळून जाण्यात मदत
मुसेवाला हत्याकांडात सहभागी असणाऱ्या केशवने हरियाणा मॉड्यूलचे 3 शूटर्स प्रियवर्त फौजी, अंकित सेरसा व कशीश यांना पळून जाण्यात मदत केली. हत्येनंतर फौजी, सेरसा व कशीश बोलेरोतून पळाले. काही किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर केशवने त्यांना आपल्या गाडीत बसवले. तेथून ते फतेहाबादला पोहोचले.काही दिवस तिथे थांबल्यानंतर ते पुढे निघाले. येथे ते अनेकजागी लपले. 19 जून रोजी सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांना खारी मिट्टी रोड मुंद्रा पोर्टलगत अटक केली.
 

Advertisement

Advertisement