सध्याच्या घडीला क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली यामध्ये कोणतंही दुमत नाही. दीर्घकाळापर्यंत विराट कोहलीने टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र या काळात त्याला टीम इंडियाला एकदाही वर्ल्डकप जिंकवून देण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. दरम्यान विराट कोहलीने नुकतंच याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
आयपीएल 2023 सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूने एक पॉडकास्ट सिरीज रिलीज केलं आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयसीसी ट्रॉफीबद्दल खुलेपणाने मत व्यक्त केलंय. यामध्ये विराटला विचारण्यात आलं की, तुला या गोष्टीचं वाईट वाटलं नाही की, तु कधी आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही.
याबाबत उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, तुम्ही नेहमी टूर्नामेंट जिंकण्यासाठीच खेळता. मी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017, वर्ल्ड कप 2019, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021, टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. यावेळी आम्ही (टीम इंडिया) चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, वर्ल्डकप सेमीफायनल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल या फेऱ्या गाठल्या होत्या. मात्र तरीही मला अपयशी कर्णधार म्हटलं गेलं.
2011 वर्ल्डकप विजेत्या टीममध्ये होता विराटचा समावेश
विराटने सांगितलं की, मी 2011 साली ज्यावेळी भारत वर्ल्डकप जिंकला होता, त्यावेळी मी टीममध्ये होतो. त्यावेळी मी फायनल सामन्यात होतो आणि पहिल्याच फायनल सामन्यामध्ये मला विजय मिळाला होता. त्यामुळे माझं कॅबिनेट ट्रॉफीमुळे भरलेलं असावं, यासाठी मी वेडा नाहीये.
माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे, माझी मानसिकता खूप मजबूत असं वाटतं आणि कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकतो तसेच सहन करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधू शकतो, अशी माझ्याप्रती सर्वांचा समज आहे. कधीकधी, तुम्हाला असं वाटतं की, एक माणूस म्हणून जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुम्हाला काही पावलं मागं जाण्याची गरज असते. त्यावेळी समजून घ्या की, तुम्ही कसे आहात, तुमचं हित कशात आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे, असंही विराट म्हणाला आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमधील टीम रॉयल चॅलेंजर बंगळुरुला एकदाही खिताब जिंकता आला नाही. त्यानंतर विराट कोहलीने या टीमचं कर्णधारपद सोडलं. कोहलीनंतर साऊथ आफ्रिकेच्या फाफ ड्यु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त केलं गेलं.