दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुधारित वेळा देखील जाहिर करण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमांवर होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन हा निर्णय झाला आहे.
परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी..
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून तर दहावीच्या परीक्षा २ मार्च पासून सुरु होत आहेत. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक आणि समाज घटक या परीक्षांकडे लक्ष देवून असतात. विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाच सहा वर्षापासून देण्यात येत होती.
गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय
प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे प्रकार, अफवा अशा घटनाही परीक्षेच्या काळात निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थींचे नुकसान होते, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पेपरफुटीच्या घटनांना आळा बसावा, परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे असे ओक यांनी म्हटले होते.
विद्यार्थ्यांना होणार लाभ
आता विद्यार्थी हित आणि पालक, विद्यार्थी मागणीनंतर आधी देण्यात येणारे १० मिनिट आता निर्धारित वेळेनंतर देण्यात येणार आहेत.
अशी आहे सुधारित वेळ
सकाळचे सत्र सकाळी ११ ते दुपारी २:१०
सकाळी ११ ते दुपारी १:१० मिनिटे
सकाळी ११ ते दुपारी १:४० मिनिटे
दुपारचे सत्र - दुपारी ३ ते सायंकाळी ६:१० मिनिटे
दुपारी ३ ते सायंकाळी ५:१० मिनिटे
दुपारी ३ ते सायंकाळी ५:४० मिनिटे