अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी जगातील टॉप-10 श्रीमंताच्या यादीतून बाहेर पडलेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, अदानींना एका दिवसात तब्बल 8 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. 29 जानेवारी रोजी त्यांची नेटवर्थ 92.7 अब्ज डॉलर्स होती. ती सोमवारी घसरून 84.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे अदानींची या क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
आठवड्याभरात 35.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान
अदानींच्या नेटवर्थमध्ये आठवड्याभरात तब्बल 35.6 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. 20 नोव्हेंबर 2022 रोजी अदानींची नेटवर्थ 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. तेथून त्यांची नेटवर्थ 65.6 अब्ज डॉलर्स घटली आहे. गौतम अदानींचा समूह भारतातील सर्वात मोठा पोर्ट ऑपरेटर आहे. हा ग्रुप भारताचा सर्वात मोठा थर्मल कोल प्रोड्यूसर व सर्वात मोठा कोळसा ट्रेडरही आहे.
अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
अमेरिकेच्या हिंडेनबर्गर रिसर्च फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी समूहाची फ्लॅगशिप कंपनी असणाऱ्या अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये रिकव्हरी झाल्याचे दिसून आले. या कंपनीचे शेअर्स 3.93% वधारून बंद झाले. तर ACC,अदानी पोर्ट, अंबुजा सीमेंट व अदानी पोर्टच्या स्टॉकमध्येही तेजी दिसून आली. याऊलट अदानी टोटल गॅस 20%, ग्रीन एनर्जी 20.00%, पॉवर 5.00%, ट्रान्समिशन 15.23% व विल्मरचे शेअर्स 5.00 टक्क्याने कोसळले.
स्टॉक मॅनिप्युलेशन, मनी लाँड्रिंगचे आरोप
हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशन, मनी लाँड्रिंग व अकाउंटिंगमध्ये फ्रॉड केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना अदानी समूहाने हा हल्ला भारतावरील हल्ला असल्याचा दावा केला आहे. कंपनी म्हणाली - 'कोणत्याही विश्वासार्हतेशिवाय हजारो मैल दूर बसलेल्या एका संस्थेने आमच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा कट रचला आहे. हे जालियनवाला बागेसारखे षडयंत्र आहे. हा एक प्रकारे भारतावरील हल्ला आहे. याद्वारे भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न होत आहे.'