Advertisement

आदर्श मुख्याध्यापिका:शेख साबेरा युसुफ

प्रजापत्र | Sunday, 29/01/2023
बातमी शेअर करा

"गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा " या उक्तीप्रमाणे मला लाभलेल्या, भावलेल्या आदर्श शिक्षिका माननीय सौ. शेख सबेरा युसुफ मॅडम आदर्श शिक्षिका, उत्कृष्ट मुख्याध्यापिका म्हणून ज्यांचा उल्लेख करावा तो थोडाच....  १९८५ जिल्हा परिषद कन्या शाळा, अमळनेर भांड्याचे. येथे रुजू झालेल्या स्त्री शिक्षिका ते २०१४ पासून आदर्श मुख्याध्यापिका पदी- शाळा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधनवाडी,बीड. येथे कार्यरत असणाऱ्या आमच्या आदर्श शेख मॅडम.

 


 

मॅडम जिथे जातील त्या शाळेचा कायापालट करून ठेवणारच हे गणित अगदी ठरलेलंच.आतापर्यंत त्यांच्या हातून किती विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्कृष्ट घडून गेल्या, जात आहेत आणि अजूनही जाणार आहेत, हे सांगता येणार नाही. माझ्या आई नंतर जर कुणी माझ्या आदर्श असतील तर त्या माझ्या आवडत्या शेख मॅडम माझ्या आईने आमच्या सर्व भावंडांमध्ये शिक्षणाची गोडी लहानपणापासूनच निर्माण केली. मी माझ्या आईला देखील तेवढाच आदर्श मानते. पण आई नंतर प्रेमाने, ओरडून शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या किंवा आमच्यासाठी जीवाचं रान करून शिकवणाऱ्या आमच्या शेख मॅडम. इयत्ता- पाचवी पासून ते सातवी पर्यंत हिंदी, मराठी, विज्ञान हे विषय त्यांनी इतके जीव तोडून आम्हाला शिकवले की, त्या विषयाची गोडी आम्हाला निर्माण केली. फक्त गोडीच निर्माण केली नाही, तर त्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन करून विविध स्पर्धा परीक्षा त्याही काळामध्ये आमच्याकडून उत्तीर्ण करून घेतल्या. स्कॉलरशिप, नवोदय त्याचबरोबर हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा यांच महत्त्व त्यांनी आम्हाला सांगून आमची तयारी करून घेतली व त्या परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन केलं.... त्यांनी विशेष करून मुलींच्या शिक्षणाकडे पालकांचे लक्ष केंद्रित केले व मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विशेष प्रयत्न केला. पालकांनाही मॅडमने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वासच असायचा आणि त्या विश्वासाच्या बळावर ते मुलींना मॅडम सोबत पाठविण्यासाठी किंवा मॅडम ज्या परीक्षा म्हणतील त्या परीक्षांना बसविण्यासाठी तयारच असायचे. मॅडम जास्तीचा वेळ देऊन त्या परीक्षांचं मार्गदर्शन करून मुलींकडून खूप तयारी करून घ्यायच्या. मला स्वतः मॅडम कडे पाहून आपणही पुढे शिक्षिका व्हावं असं वाटायचं आणि माझ्या आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे ते मला पुढे साध्य ही करता आलं. मॅडम तुमच्या अनेक गुणांची पारख मला त्याही छोट्याश्या वयामध्ये जाणवली होती. तेव्हा सांगता आलं नाही पण मॅडम मला तुम्ही खूप आवडायच्या आणि तुम्ही देखील मला तुमच्या मुलीप्रमाणे जीव लावत असायच्या. मॅडम मध्यंतरी बराच काळ तुमचा संपर्क होऊ शकला नाही. परंतु जेव्हा मला तुमचा नंबर मिळाला, तेव्हा इतका आनंद झाला की, तो आनंद गगनातही मावला नाही. मॅडम आजही तुमच्याशी बोलताना तुम्ही जेव्हा माझी मुलगी, माझे जावई, माझ्या नाती असा उल्लेख करता त्यावेळेस खूप भरून येतं आणि तुम्हाला भेटण्याची ओढ लागून राहते. मॅडम मी अगदी अर्धा तास तुमची धावती भेट घेतली होती, तेव्हा खूप आनंद झाला होता की,आज मी एक शिक्षिका म्हणून माझ्या मॅडमच्या बरोबरीने उभी आहे.तो फक्त तुमचा आशीर्वाद आणि माझ्या आई-वडिलांचे कष्ट व आशीर्वाद.... मॅडम प्रत्येक वेळेस भ्रमणध्वनीवर संभाषण होताना फोन उचलल्याच्या नंतर तुमचा तो आपुलकीचा आवाज आणि प्रेमाची विचारपूस खूप बळ देऊन जाते. तुम्ही आजही तेवढेच आपुलकीने तुझं काय चाललंय ,तुझ्या शाळेचं काय चाललंय, माझ्या नाती काय करतात हे वेळात वेळ काढून विचारता खूपच छान ! 
मॅडम कधीही छडी खाण्याची वेळ आली नाही पण आयुष्यात या ओळी बरंच काही सांगून जातात....
छडीनजरेपुढे कठोर होते, नजरेआडून पाझरते मॅडम, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
पुस्तकांची हाक ,  दप्तराच्या कंठातून
संस्कारांच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून
शिष्य म्हणून, युवक म्हणून, 'माणूस' म्हणून घडवते.
मॅडम, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं जर 
विचारांची पोहोच कधी गेली नसती.ध्येयावर
अडथळयांचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते
मॅडम, तुमची छडी अजून भविष्याला सावरते !!
आठवणींच्या फळयावरती अजून आहेत सुविचार
शिस्तीच्या त्या गणिताला ममत्वाचा गुणाकार
नजरेमध्ये सूर्य घेऊन आभाळ व्हायला शिकवते मॅडम,तुमची छडी अजून भविष्याला सावरते.
मॅडम,आपल्या सेवापुर्ती कृतज्ञता सोहळ्यास माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा .... यापुढे आपले आयुष्य आनंददायी व आपल्याला चांगले आरोग्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

आपलीच विद्यार्थिनी -
आशा दादासाहेब ढाकणे.(तांदळे आशा रामनाथ) 
कन्या विद्यालय, चाकण. 
ता.खेड,जि.पुणे. कार्यरत शिक्षिका व
नॅशनल एज्युकेशन एक्सलेन्स अवॉर्ड २०१९ विजेती आदर्श शिक्षिका

 

Advertisement

Advertisement