Advertisement

मृत्यूनंतर होणारी हेळसांड थांबविण्यासाठी जिवंतपणीच स्मशानभुमीत सरणावर उपोषण

प्रजापत्र | Saturday, 28/01/2023
बातमी शेअर करा

उस्मानाबाद : मृत्यूनंतर होणारी हेळसांड थांबविण्यासाठी जिवंतपणीच स्मशानभूमीत सरणावर ऑल इंडिया पँथर सेनेच्या पाचव्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे. स्मशानभूमीच्या नोंद घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात रखडला आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी सोमवारी भूम बंद चा इशारा देण्यात आला आहे.

भूम शहरातील बौद्ध बांधव मागील अनेक वर्षांपासून सध्या असलेल्या  स्मशानभुमी मध्ये मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करतात. परंतु त्या स्मशानभुमी मध्ये दहन शेड, लाईट, सरंक्षण भिंत, पाणी, आदी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे बौद्ध बांधवांना मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. कित्येक वेळा कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडुन इतरत्र फेकलायचे प्रकार अनेक वेळा घडल्याचे नागरिक सांगतात.

येथील नागरिकांनी मागील कित्येक वर्षांपासून स्मशानभूमीचा विकास करून विविध सोई सुविधा देण्याची मागणी स्थानिक प्रशासना कडे विनंती अर्जाद्वारे केलेली आहे. परंतु  स्मशानभुमीच्या जागेची नोंदच शासन दरबारी नव्हती. स्मशानभूमीच्या जागेची नोंद होण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने 13 ऑगस्ट रोजी स्माशनभुमीत दोन दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले होते.  त्यावेळी स्थानिक प्रशासनाने 10  दिवसात स्माशनभुमी चा प्रस्ताव विना त्रुटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. तसेच दोन महिन्यांत प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. 

स्थानिक प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव हा  उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने नाकारून उपविभागीय अधिकारी भूम यांच्या कडे परत पाठविण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने भूम नगर परिषदेने ती जागा उद्या उद्यानासाठी आरक्षित केल्याने नाकारली. जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या सूचनेनुसार भूम नगर परिषदेने उद्यानाचे आरक्षण रद्द केल्याशिवाय ती जागा देता येत  नाही असे आदेशीत केले होते.

त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये नगर परिषद भूम नवीन नवीन विकास आराखडा तयार करून स्मशानभूमीच्या जागेवरील उद्यानाचे आरक्षण रद्द करून ती जागा बौद्ध स्माशनभुमी साठी आरक्षित करण्यात आली. त्यानुसार उपविभागीय अधिकारी भूम यांनी नोंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे असताना तो पाठवून दिला नाही. 

ही बाब ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकारी यांना 29 डिसेंबर रोजी पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर  समजली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडे पाठवला. चार दिवसांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने परत भूम उपविभागीय अधिकारी यांना नगर परिषद, तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांचा स्वयं स्पष्ट अहवाल 
द्यावा यासाठी परत पाठविण्यात आला. 

त्यानंतर अहवाल 23 जानेवारी 2023 पर्यंत उपविभागीय अधिकारी भूम यांच्या कार्यालयाकडेच होता. या प्रस्तावाची चौकशी पँथर सेनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली असता तो प्रस्ताव अजून ही त्यांना प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेने 25 जानेवारी रोजी पुन्हा स्मशानभूमीत सरणावर बसून उपोषण करण्याचा निर्णय घेतला. बुधवार 25 जानेवारी रोजी चंद्रमणी गायकवाड, विकी जावळे, अजित सोनवणे  हे स्माशनभुमीत सरणावर उपोषणास बसल्यावर  उप विभागीय अधिकारी भूम यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सायंकाळी पाठविला.

सदारील प्रस्ताव 25 जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येऊन ही कुठलाही आज रोजी पर्यंत निर्णय घेतला नसल्याचे समजते.  यामुळे भूम शहरातील बौद्ध उपासक व उपासिका यांनी उपोषण कर्त्यांच्या पाठींब्यासाठी  सोमवारी भूम शहर बंद ठेवून गोलाई चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 भूम शहरातील बौद्ध महिलांनी शुक्रवार 27 जानेवारी रोजी उप विभागीय अधिकारी यांना घेराव घालुन कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी निवेदन देऊन बौद्ध स्माशनभुमीची मागनी मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद  व कळंब येथील ऑल इंडिया पँथर सेनेच्या पदाधिकरी यांनी उपोषणाला पाठींबा देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement