स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित गट-ब आणि गट-क संवर्गातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली असून, तब्बल 8,169 पदांसाठी परीक्षा होणार आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
MPSC करणारे बहुतांश विद्यार्थी गट-ब आणि गट-क संवर्गातील नोकऱ्यांसाठी तयारी करतात. नवीन अभ्यासक्रमाची घोषणा झाल्यापासून विद्यार्थी या जाहिरातीची वाट पाहत होते. कारण, गट-ब आणि गट-क मधील पदांसाठी संयुक्त परीक्षा होणार आहे. त्यामुळे मेगाभरती होणार अशी माहिती आधीच देण्यात आली होती. आज अखेर ही मेगाभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षा कधी होणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8,169 जागांची जाहिरात काढली आहे. राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी आयोगाकडून तारखाही जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. , तर गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2 सप्टेंबरला आणि गट-क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला घेण्यात येईल.
या पदांचे सर्वाधिक आकर्षण
गट-ब संवर्गातील तीन पदांसाठी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. यातील, सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO) यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे यात आहेत. याशिवाय, वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक(STI)ची 159 पदे आणि ग्रह विभागातील पोलीस उपनिरीक्षक(PSI) साठी 374 पदे भरली जातील. याशिवाय, गृह विभागातील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (Exise PSI)साठी फक्त 6 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, यंदाच्या जाहिरातीतल लिपिक टंकलेखक पदासाठी सर्वाधइक 7034 जागा काढण्यात आल्या आहेत.