पुणे, दि. २० : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे स्थित लोढा बेलमोंडो या प्रकल्पातील २८०० फ्लॅटधारक विकसक व राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रणित लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनी विरोधात रविवार रोजी तीव्र आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला विकसक आणि कंपनीने योग्य प्रतिसाद न दिल्यास आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करून व ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात दोन्ही ठिकाणी लढण्याचा निर्णय बेलमोंडो प्रकल्पातील ग्राहकांनी जाहीर केला आहे. विकसक व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व त्यांच्या कंपनीने लोढा बेलमोंडो या प्रकल्पातील सुमारे २८०० फ्लॅटधारकांचा फसवणूक केली गेल्याचा दावा आहे. वारंवार अर्ज–विनंत्या करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकल्पातील फ्लॅटधारकांनी हा आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता करारनामा योग्य प्रक्रियेने न करणे, मेंटेनन्सच्या नावाखाली अवाजवी रक्कम अनिवार्य असल्याचे सांगून वसूल करणे, बांधकामाची अपेक्षित गुणवत्ता न राखणे, सोसायटीची स्थापना न करणे, कन्व्हेअन्स डीड न करून देणे, ग्राहकांनी बनवलेली व नोंदणी केलेली सोसायटी व फेडरेशनची नोंदणी रद्द करायला लावणे, वारंवार मागूनही कंपनीचा व मेंटनन्सचा कोणताही हिशेब न देणे असे अनेक गलथान कारभार या प्रकल्पात आहेत. यामाध्यमातून विकसक व कॅबिनेट मंत्री लोढा यांनी ग्राहकांची घोर फसवणूक केली आहे. त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. कॅबिनेट मंत्री व विकसक लोढा यांनी मोफा आणि रेरा कायद्याची मोठ्या प्रमाणात पायमल्ली केल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, या प्रकल्पातील कामाची गुणवत्ता अगदीच सुमार असून घरातील सर्व टाईल्स निघणे, पोकळ असणे, लिकेज, चोक अप अशा अनेक समस्यांचा फ्लॅटधारकांना सर्रास सामना करावा लागतो. अशा अनियमतता, गैरसोयी आणि बेकादशीर पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या या गोष्टींविरोधात प्रकल्पातील फ्लॅटधारक ग्राहकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे. संबंधीत पोलिस, स्थानिक प्रशासन व राजकारणी व संबंधीत शासकीय यंत्रणा देखील कॅबिनेट मंत्री व विकसक मंगलप्रभात लोढा यांच्या बाजुने काम करत असून शासकीय यंत्रणाचा हा गैरवापर तातडीने बंद करून आम्हाला न्याय देण्याच्या मागणीसाठी फ्लॅटधारकांनी हे आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
प्रजापत्र | Friday, 20/01/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा