पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला समृद्धी महामार्ग अपघात मार्ग ठरत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. दुर्घटनांचा सापळा ठरलेल्या महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. आज शुक्रवारी पहाटे असोला( ता. देऊळगाव राजा) नजीक खाजगी बस उलटून किमान २० प्रवासी जखमी झाले. या बसमधून बाहेर निघून उभ्या असलेल्या दोघाना अन्य भरधाव वाहनाने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा विस्तृत तपशिल अजून कळाला नाही.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार नागपूर येथून औरंगाबाद कडे जाणारी राही ट्रॅव्हल्स ची( एम.एच. २० एल ४९९९ क्रमांकाची) बस असोला नजीक भरवेगात उलटली. किमान २० प्रवासी जखमी झाले. यातील काही प्रवासी बस बाहेर उभे असताना वेगाने जाणाऱ्या वाहनाने यापैकी दोघाना चिरडले. यामुळे एकजण घटनास्थळी दगावला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. त्याला देऊळगाव राजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. वाहतुकीस अडथळा ठरलेली अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे.