अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. या महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. यासंदर्भात संबंधित मॉडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
अभिनेत्री शरलीन चोप्रानं यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे. ‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.
दरम्यान, राखी सावंतला थोड्या वेळात न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल, याबाबत चित्र स्पष्ट होईल.
डान्स अकॅडेमीचं होणार होतं उद्घाटन
राखी सावंत आज दुपारी तिचा पती आदिल खान दुरानी याच्यासमवेत भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं उद्घाटनही करणार होती. दुपारी ३ च्या सुमारास हे उद्घाटन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
‘ती’ मॉडेल शरलीन चोप्राच?
दरम्यान, राखीविरोधात शरलीन चोप्रानंच तक्रार दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.