कोल्हापूर येथील राजारामपुरीतील लोटस जनसाधारण हॉस्पिटलमध्ये एका पन्नास वर्षाच्या वयाच्या महिलेच्या पोटातून ५ किलो वजनाच्या तब्बल ६५ गाठी काढण्यात डॉक्टरांना यश आले. या गाठी गर्भाशयाच्या कॅन्सरच्या होत्या.
पोटामध्ये गाठ असल्याची तक्रार घेऊन महिला राजारामपुरीतील लोटस हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तपासणी व विविध चाचण्यानंतर ती गाठ फाइब्रॉइड म्हणजेच गर्भाशयाचा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले व पोटातील सर्व जागा या गाठीमुळे व्यापली गेली होती. साधारणतः नऊ महिन्याच्या गरोदर स्त्रीच्या गर्भाशयाएवढी मोठी ही गाठ होती. त्या महिलेस उच्च रक्तदाब व सौम्य मधुमेह असल्याने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. डॉ. निरंजन शहा व त्यांच्या सहकारी डॉक्टर्सनी सर्व वैद्यकीय बाबींची पूर्ण काळजी घेऊन या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रिया करताना असे निदर्शनास आले की, गर्भाशयाचा आकार वाढला असून त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा ६५ गाठी आहेत. पाच किलो इतके वजन असणाऱ्या या गाठी काढण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर पश्चात उपचाराची पूर्णतः काळजी घेऊन या महिलेला पाचव्या दिवशी घरी पाठवण्यात आले. अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉ. शहा, डॉ. वैशाली, डॉ. सारिका सावंत, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव, कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिलीप कुलकर्णी व रुग्णालयाच्या स्टाफने कुशलतेने पार पाडली.