नाशिक/बार्शी दि.१ (प्रतिनिधी)-नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून यात तीन महिलांचा होरपळून मृत्यु झाला तर बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून ३० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत आतापर्यंत १९ स्फोट झाले आहेत. तर भीषण आगीमुळे आकाशात धुराचे लोट असल्याने मुंबईहून दिल्लीकडे जाणारे विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफील्म कंपनीतील एका प्लँटमधे बॉयलरच्या स्फोटाने भयंकर आग लागली. या आगीत आतापर्यंत १९ कामगारांना रेस्क्यू करण्यात आले होते. यातील ४ कामगार गंभीर असताना यातील तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत व जखमींवर सर्व उपचार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठा असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यातील एस एस पी 2 या प्लँटमधे सकाळी आठ ते अडीच वाजेच्या शिफ्टला जवळपास 100 कामगार उपस्थित होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बॉयलर हीट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या प्लँटमधील 19 कामगारांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते पैकी तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या आगीचे रौद्ररूप इतके भयंकर होते की इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आकाशात आगीचे लोळ अद्यापही दिसत आहेत.
दुसरी घटना बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखानावर घडली. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने पाच जणांचा मृत्यु झाला असून मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ४ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा