विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यात आता विरोधक अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधीपक्ष नेत्याच्या गुळमुळीत भूमिकेवर विरोधीपक्षातील सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता अजित पवार स्वतःच आक्रमक आले आहेत. यामुळे राज्यातील सरकारला विधिमंडळात हा आठवडा कामकाज रेटून नेने अवघड होणार आहे. विरोधीपक्षाचा आवाज बंद करून अधिवेशन रेटून नेण्याचा प्रयत्न झाल्यास तो सरकारच्या अधिकच अंगलट येईल.
विधिमंडळ अधिवेशनातील दुसर्या आठवड्याचा पहिला दिवस गाजला तोच विरोधीपक्षाच्या आक्रमकतेमुळे. विधानसभेत अजित पवार आणि विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी जी आक्रमकता दाखविली , ती सरकारला अडचणीत जाणारी होती. मुळातच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी बाहेरून कोणी काही करण्याची गरज नाहीच. शिंदे सेने आणि भाजपमधील अंतर्विरोध आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बेमुर्वतखोरपणा हाच या सरकारच्या कोंडीला कारणीभूत ठरणार आहे. ज्या प्रश्नावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री अडचणीत येऊ शकतात , ते मुद्दे कोणी उपस्थित केले होते हे काही आता लपून राहिलेले नाही. पहिल्या आठवड्यात त्यावरून गोंधळ झाल्यानंतर आता दुसर्या आठवड्यात अब्दुल सत्तार हे शिंदे सरकारची डोकेदुखी ठरणार आहेत. अब्दुल सत्तार यांनी जेव्हा खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अशालंघ्य वक्तव्य केले होते, तेव्हाच खरेतर सत्तार यांच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट होते. त्यानुसार आता सत्तार यांची प्रकरणे बाहेर निघत आहेत.अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधीपक्ष नेते असलेले अजित पवार फारसे आक्रमक नव्हते. अगदी जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर देखील अजित पवार यांची भूमिका मवाळच होती . जेथे शिंदे सरकारला कोंडीत पकडणे शक्य आहे तेथेही अजित पवार आक्रमक नसल्याने सर्वांनीच व्यक्त केलेल्या नाराजीनानंतर आता खुद्द शरद पवारांनीच अजित पवारांना ’गोष्टी सांगेन युक्तीच्या ’ म्हणत सुनावले असल्याची माहिती आहे. हे खरे असेल किंवा खोटे , राष्ट्रवादीत अजित पवार स्वस्थ असतील किंवा अस्वस्थ आणि सरकार पक्षाकडून अजित पवारांना भलेही थेट निमंत्रण दिले जात असेल, मात्र दुसर्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी अजित पवारांनी आक्रमकता काय असते हे देखील दाखवून दिले आहे. अर्थात यामध्येही अजित पवार आक्रमक झालेत ते शिंदे सेनेवर, आणि आता शिंदे सेना हे भाजपसाठी देखील ’जड झाले ओझे ’ असेच होऊ लागले आहे. किमान फडणवीसांच्या देहबोलीवरून तसे भासत आणि दिसत आहे . त्यामुळे अब्दुल सत्तार काय किंवा उद्या आणखी कोणी काय, विरोधकांच्या आक्रमकतेला कोण बळी पडणार हे सांगता येत नाही. असाही महाराष्ट्राला सत्तेतल्या लोकांनीच विरोधीपक्षाला रसद पुरविण्याचा प्रदीर्घ वारसा आहेच. शरद पवार राज्यात मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे त्यांच्यावर ज्या तोफा डागायचे, त्या दारूगोळ्याचा मसाला कोठून येत होता हे काही लपून राहिलेले नाही. त्यानंतरही अनेकदा विरोधीपक्षाला सत्तेतल्याच लोकांनी ’मसाले ’ दिले आहेतच. आताही वेगळे काही होत असेल असे नाही. त्यामुळेच आता अधिवेशन पुढे रेटने सरकारसाठी अवघड जाणार आहे. कमीला अधिक म्गहणून आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केलेले उद्धव ठाकरे स्वतः अधिवेशनात हजर झाले आहेत. त्यांनी विधानपरिषदेत सरकारवर ज्या पद्धतीने आरोप केले आहेत, ते पाहता आता विधानपरिषदेत देखील सरकारची परीक्षा अवघड असणार आहे. म्हणूनच खर्या अर्थाने आता सरकारचा कस लागणार आहे.