कर्नाटकच्या बागलकोटमध्ये एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची 32 तुकडे करून निघृण हत्या केल्याची बाब उजेडात आली आहे. हत्येनंतर तरूणाने हे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी JCBच्या मदतीने बोअरवेल खोदून बॉडीपार्ट्स बाहेर काढले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विठ्ठल कुलाल याला बेड्या ठोकल्या आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, गत मंगळवारी विठ्ठल याचे आपले 54 वर्षीय वडील परशुराम कुलाल यांच्याशी ऊसाला पाणी देण्याच्या मुद्यावरून भांडण झाले होते. या प्रकरणी परशुराम यांनी आपल्या मुलाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपी विठ्ठलने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडील दारूच्या नशेत नेहमीच मारहाण करत होते
पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाने वडिलांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. विठ्ठलने सांगितले की, त्याचे वडील त्याला नेहमीच मारहाण करत होते शिवीगाळ करत होते. ही गोष्ट सहन करण्याच्या पलिकडे गेली होती. मृत व्यक्तीला 2 मुले आहेत. मोठा मुलगा व पत्नी मारहाणीला कंटाळून गत अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
कशी उजेडात आली घटना?
पोलिसांच्या माहितीनुसार, मोठा मुलगा व पत्नीच्या तक्रारीनंतर या खुनाचा खुलासा झाला. या दोघांनी सांगितले की, परशुरामच्या दररोजच्या मारहाणीला कंटाळून आम्ही दोघेही त्यांच्यापासून वेगळे राहत होतो. घटनेच्या 3 दिवसांनी कुटुंबाने परशुराम यांच्याविषयी विचारणा केली असता, त्याने त्यांना ठार मारल्याचे सांगितले. आई व मोठ्या मुलाने त्याला पोलिसांना शरण जाण्याचा सल्ला दिला. पण तो ऐकला नाही. त्यानंतर त्यांनी मुधोला पोलिस ठाण्यात जावून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.