रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेला नसता तर इशान किशनला ( Ishan Kishan) संधी मिळाली नसती अन् आज ज्या पद्धतीने तो खेळला ती फटकेबाजीही पाहता आली नसती. इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला.
इशान किशन व शिखर धवन ही जोडी सलामीला आली, परंतु बांगलादेशने पाचव्या षटकात धक्का दिला. धवन ३ धावांवर मेहिदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली १ धावावर असताना लिटन दासने सोपा झेल सोडला. इशान व विराट यांनी त्यानंतर सावध खेळ करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना आव्हान दिले. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. इशानने १२६ चेंडूंत २३ चौकार व ९ षटकारांसह वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक पूर्ण केले.
वन डे क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक ठरले आणि तो भारताकडून द्विशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला. इशान हा वन डे त द्विशतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला. त्याने २४ व र्ष व १४५ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना रोहितचा ( २६ वर्ष व १८६ दिवस) विक्रम मोडला. इशान १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांसह २१० धावांवर बाद झाला.
विराटने ऑगस्ट २०१९नंतर वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. जवळपास १२०० हून अधिक दिवसानंतर विराटने शतक झळकावले आणि रिकी पाँटिंग व सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले. विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४४ वे शतक ठरले. त्याने सर्वात कमी २५६ डावांत ४४ शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या ४१८ डावांत ४४ शतकांचा विक्रम मोडला. विराट ९१ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११३ धावांवर माघारी परतला. विराटचे हे ७२वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आणि त्याने पाँटिंगला ( ७१) मागे टाकले.