Advertisement

दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल

प्रजापत्र | Friday, 09/12/2022
बातमी शेअर करा

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांचे नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत आहेत. याचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे. असे असताना बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

विद्यार्थ्यांना यंदापासून त्यांच्या शाळेतच त्यांचे परीक्षा केंद्र मिळणार नाही, तसेच कोरोना काळात जो ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जात होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात येणार असून पूर्वीप्रमाणेच नियम असणार आहेत. 

 

“कोरोना महामारीवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ सुरू करण्यात आला. आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे, आम्ही जुने नियम परत आणत आहोत” असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

 

ऑनलाइन वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी आल्याने त्यांना भरपाईसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होम सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली होती. आगामी बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे.

 

संभाव्य वेळापत्रक...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होणार आहेत. 

Advertisement

Advertisement