Advertisement

'ज्योतीबा' संस्थेने केलेली सेवा समाप्तीची कारवाई आकसापोटी, न्यायालयात मागणार दाद: म्हसे

प्रजापत्र | Saturday, 19/11/2022
बातमी शेअर करा

खेड: ज्योतीबा एज्युकेशन सोसायटीच्या बाबुराव पवार माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक दामोदर म्हसे यांच्या सेवा समाप्तीची संस्थेने केलेली कारवाई आकसापोटी करण्यात आलेली आहे. त्याबाबत आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे दामोदर म्हसे यांनी म्हटले आहे. 

ज्योतीबा शिक्षण संस्थेच्या बाबुराव पवार माध्यमिक विद्यालयाचा वाद सध्या सुरु आहे. संस्थेने शाळेचे मुख्याध्यापक दामोदर म्हसे यांच्या सेवा समाप्त केल्या होत्या, त्यावर आता म्हसे यांनी आपली बाजू मांडली आहे. 

म्हसे यांनी पुढे खुलाशात असेही सांगितले की, मी मागील बारा वर्षांपासून विद्यालयाचे प्रशासन उत्तम प्रकारे सांभाळत होतो. परंतु संस्थेच्या अध्यक्षा, सचिव यांनी विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने फि वसुल करत होते. याबद्दलही मी आवाज उठवला होता. याच बाबीचा कुठे तरी मनात राग धरून मला तीन अपत्य असल्याची बतावणी करून माझ्यावर शासन नियमांचा दाखला देऊन बेकायदेशीर ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तीन अपत्यच्या बद्दल असा कोणताही उल्लेख शासन आदेशात स्पष्टपणे दिसून येत नाही. 

मी मागील १५ वर्ष विद्यालयात गणित व विज्ञान विषयांचे अध्यापन उत्तम प्रकारे करत आहे. माझ्या अध्ययनाच्या कार्यकाळात मी शिकवत असलेल्या गणित व विज्ञान या विषयाचा निकाल सतत ८०% च्यावर असूनही संस्थेने कोणत्या तरी आकसापोटी ही कारवाई केली आहे. त्याला मी न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हसे यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement