Advertisement

राज्यातील पदभरतीचा मार्ग मोकळा

प्रजापत्र | Thursday, 17/11/2022
बातमी शेअर करा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यात राज्यातील नोकरभरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या कंपन्यांकडून घेतल्या जाणार आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरती प्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 

 

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, गट क आणि गट ड ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली. 

 

 

 

संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करायचा आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405  जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळं 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  
 

Advertisement

Advertisement