चाकण, ता. १७ : बिरदवडी (ता. खेड) येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटी संचालित, बाबुराव पवार माध्यमिक विद्यालयातील सहा. शिक्षक श्री. दामोदर काशीनाथ म्हसे (वय ४८, रा. चाकण, मूळ गाव होलेवाडी) यांची विभागीय चौकशी करून संस्थेच्या ठरावानुसार दिनांक. १७/११/२०२२ पासून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सदर शिक्षक अनुदानित शाळेत सेवा करीत असतांना, विनापरवानगी मोठ्या कालावधीसाठी शाळेत गैरहजर राहणे, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण ठेवणे, विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांच्या अध्यापनाबाबतच्या तक्रारी, संस्थेच्या सभासदाला हाताशी धरून नियमबाह्यपणे प्रभारी मुख्याध्यापकांना बडतर्फचे पत्र निर्गमित करणे व त्यांच्याशी अपमानास्पद पत्रव्यवहार करणे तसेच संस्था पदाधिकारी व प्रभारी मुख्याध्यापक यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी देणे यासारखे प्रकार करून सेवाशर्ती आणि नियमावलीचा भंग केला. या शिक्षकास तीन अपत्य असल्याने, मा. शिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, पुणे यांनी देखील लहान कुटुंब अधिनियम २००५ अन्वये कारवाई करणेबाबत संस्थेस कळविले आहे. या व्यक्तीने मुख्याध्यापक असतांना देखील कामकाजात अनियमीता दाखवून शालेय रेकॉर्ड जतन न करता गहाळ करणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके अपूर्ण ठेवणे, कर्मचाऱ्यांचे पगार रोखणे, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणारा आयकर न भरणे, शाळेतील इतर शिक्षकांशी व पालकांशी वाद घालणे, पालक सभेस अनुपस्थित राहणे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तुणूक करणे तसेच शाळा कार्यक्षमरीत्या चालविण्याबाबत व्यवस्थापक वर्गास जबाबदार असतांना गैरवर्तुणूक करणे. हे सर्व कृत्य करून त्यांनी त्यांच्या काळातील मुख्याध्यापक पदाचे कर्तव्य देखील कधीच पार पडले नाही. त्यामुळे हे सर्व आरोप त्यांच्यावर ठेवून संस्थेने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ३६ नुसार चौकशी समिती नेमून, समितीने श्री. म्हसे यांची चौकशी करून चौकशी अहवाल संस्थेकडे सादर केला. या अहवालात चौकशी समितीच्या ३ पैकी २ सदस्यांनी सदर शिक्षकास दोषी ठरविल्यामुळे संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ठराव घेऊन अहवालातील निष्कर्ष व निर्णय पाहता जबर शिक्षा म्हणून दिनांक १७/११/२०२२ पासून श्री. म्हसे यांची सेवा समाप्त केलेली आहे. सदर सेवा समाप्तीच्या आदेशाची प्रत शिक्षकास आणि मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पुणे यांना पाठविण्यात आली आहे, अशी माहिती संस्था सचिवांनी दिली.
बातमी शेअर करा