Advertisement

ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी जीएसटी संकलन, महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

प्रजापत्र | Tuesday, 01/11/2022
बातमी शेअर करा

देशात ऑक्टोबर महिन्यातील कर संकलनाबाबत चांगली बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलनात (GST Collection in October 2022) वाढ झाली आहे. मागील महिन्यात 1,51,718 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. याआधी एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा झाला.  

 

सलग आठव्या महिन्यात देशात जीएसटी 1.4 लाख कोटींहून अधिक जमा झाला आहे. यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा कर संकलनाचा उच्चांक गाठला गेला आहे. 

 

ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कर संकलन 1,51,718 कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी हा 26,039 कोटी रुपये इतका होता. तर, राज्यांच्या वाटा हा 33,396 कोटी रुपयांचा आहे. आयजीएसटी 81,778 कोटी रुपये आहे. यातील  37,297 कोटी रुपये हे आयात करण्यात आलेल्या वस्तूंचे आहे. तर, 10,505 कोटी रुपये हे उपकरातून जमा झाले आहेत. यातील 825 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून जमा झाले आहेत. 

 

सप्टेंबर 2022 मध्ये 8.3 कोटी ई-वे बिल जनरेट झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात ई-वे बिल 7.7 कोटी रुपये होते. जीएसटी करात वाढ होणे ही बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब समजली जाते. 
 

Advertisement

Advertisement