पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला छोटे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळच्या सुमारास तिसऱ्यावा या एक्स्प्रेसला तशाच स्वरुपाचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
गुजरातमध्ये घडली घटना
गुजरातमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे तिच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं. वलसाडच्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला, एक गाय अचानक रेल्वेच्या समोर आल्यामुळे ही धडक झाली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर जवळपास अर्धा तास वंदे भारत एक्स्प्रेस अतुल रेल्वे स्थानकावर उभी ठेवण्यात आली होती. या अपघातामध्ये रेल्वेच्या कपलरच्या कव्हरचंही नुकसान झालं असून बीसीयू कव्हरचंही नुकसान झाल्याचं सांगितलं दात आहे. याशिवाय, रेल्वेमध्ये पाणीपुरवठा करणारा पाण्याचा पाईपदेखील नादुरुस्त झाला. या अपघातामध्ये प्रवाशांना कोणतंही नुकसान झालं नाही.