Advertisement

सितरंग चक्रीवादळाचा धोका

प्रजापत्र | Monday, 24/10/2022
बातमी शेअर करा

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, मध्य बंगालच्या उपसागरावर 'सितरंग' नावाचे चक्रीवादळात तयार झाले आहे. हवामान खात्याने सांगितले की, "ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास 24 ऑक्टोबरला त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यानंतर ते 25 ऑक्टोबर रोजी उत्तर-ईशान्येकडे सरकत राहील. सकाळी 10च्या सुमारास, तिनाकोना बेट आणि सँडविचदरम्यान बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची दाट शक्यता आहे.अंदमान समुद्रावरील कमी दाबाची प्रणाली तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन 25 ऑक्टोबरला पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर पोहोचेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारीच दिला होता.

 

 

ईशान्य भारतात पावसाचा इशारा
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरातील कमी दाब आणि खोल दाबामुळे ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबर 2022 रोजी 50 ते 60KMph वेगाने वारे वाहतील आणि विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.25 ऑक्टोबर 2022 रोजी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका त्रिपुराला बसणार असून 24 तासांत कमाल 200 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

5 राज्यांना रेड अलर्ट, 2 राज्यांना ऑरेंज अलर्ट
त्रिपुरा, आसाम, मिझोराम, मणिपूर आणि नागालँडसाठी IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे त्रिपुरा सरकारने 26 ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ईशान्येकडील राज्यांसाठी एनडीआरएफला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे.

 

 

मच्छिमारांनाही इशारा
येथे मच्छिमारांना 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये (दक्षिण आणि उत्तर 24 परगणा आणि पूर्व मेदिनीपूर) नुकसान होण्याची शक्यता आहे. त्रिपुरा, मिझोराम, पूर्व मेघालय, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्येही नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

Advertisement

Advertisement