बीड : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रशासक मंडळाची मुदत संपली होती, त्यानंतर अशासकीय सदस्यांचे प्रशासक मंडळ बँकेवर आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या .मात्र राज्य सरकारने अशासकीय सदस्यांऐवजी पुन्हा एकदा बँकेचा कारभार अधिकाऱ्यांच्याच हाती दिला आहे. बँकेच्या पूर्वीच्या प्रशासक मंडळातील अशासकीय सदस्य वगळून केवळ अविनाश पाठक आणि अशोक कदम या अधिकाऱ्यांच्या प्रशासक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अशासकीय सदस्यांचे मंडळ नेमण्याच्या हालचाली भाजपच्या गोटातून सुरु झाल्या होत्या. स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील यात पुढाकार घेतला होता . भाजपच्या गोटातून सदस्यांची एक यादी देखील तयार करण्यात आली होती. मात्र आता या यादीला मुख्यमंत्री कार्यालयातूनच खो देण्यात आला आहे. जिल्हा बँकेवर अशासकीय सदस्यांचे नवीन मंडळ नेमण्याऐवजी जुन्याच प्रशासक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली असून त्यातून तीन अशासकीय सदस्य वगळण्यात आले आहेत. आता अप्पर आयुक्त अविनाश पाठक आणि सहायक निबंधक अशोक कदम हे दोघेच जिल्हा बँकेचा कारभार पाहणार आहेत.
बातमी शेअर करा