महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने भाडेवाढ करून जोरदार दणका दिला आहे. या काळात दहा टक्क्यांनी तिकीट महागणार आहे.महामंडळाने महसूल वाढीसाठी ही भाडेवाढ केलीय. दहा दिवस प्रवाशांना जादा भाडे आकारण्यात येणार आहे.
अशी आहे भाडेवाढ...
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या मध्यरात्री 00.00 नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत राहील.
यांना लागू नाही...
सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.
पासधारकांना सूट
तथापि, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.