पाथर्डी दि.९ (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील तसेच माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी रविवारी (दि.९) श्री क्षेत्र भगवानगड येथे जाऊन संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळीअनेक दिवसांची इच्छा धनंजय मुंडेंमुळे आज पूर्ण झाली, मन प्रसन्न झाल्याच्या भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.
अनेक वर्षांपूर्वी वाहतुकीची मर्यादित साधने उपलब्ध असताना भगवानगडावर चिरेबंदी बांधकाम साधत गडाची उत्तम व सुरेख उभारणी भगवानबाबांनी केली. अध्यात्म मार्गानी समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा बंद व्हाव्यात, ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढावे हा मार्ग दाखवत भगवान बाबांनी वैचारिक व प्रगल्भ पिढी निर्माण करण्याचे महान कार्य केले. मागील आघाडी सरकारच्या काळात मी अर्थमंत्री असताना भगवानगडाच्या विकासासाठी तीर्थ क्षेत्र विकासानिधीतून गडासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर केला होता, त्याची आठवण सांगत गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शनही घेतले. मागील अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र भगवानगड येथे येऊन दर्शन घेण्याची इच्छा आज आमचे सहकारी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली;असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान उभय नेत्यांनी गडाचे द्वितीय महंत भीमसिंह बाबांच्याही समधीचे दर्शन घेतले. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी गडाच्या वतीने स्वागत करून आशीर्वाद दिले. तसेच संत भगवानबाबा यांचे वस्तू संग्रहालय, गडावरील ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था व गडावर सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती दिली.
यावेळी आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब काका आजबे, युवा आघाडीचे महेबूब शेख, सतीश शिंदे, डॉ. शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, विश्वास नागरगोजे, नितीन आघाव, प्रा. निलेश आघाव यांसह पदाधिकारी व गड परिसरातील भाविक उपस्थित होते.