Advertisement

काल म्हैस, आज गाय...'वंदे भारत एक्स्प्रेस'चा सलग दुसऱ्या दिवशी अपघात

प्रजापत्र | Friday, 07/10/2022
बातमी शेअर करा

अहमदाबाद-गुजरातमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची प्राण्यांशी टक्कर होऊन अपघाताची घटना घडली आहे. आज वंदे भारत एक्स्प्रेससमोर एक गाय आल्यानं अपघात घडला. सुदैवानं यात कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच्या भागाचं काहीसं नुकसान झालेलं आहे. तर गाय जखमी झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

 

 

रेल्वेच्या माहितीनुसार आज दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी वडोदरा मंडलच्या आणंद येथे एक गाय रेल्वे ट्रॅकसमोर आल्यानं वंदे भारत एक्स्प्रेसची धडक झाली. ट्रेन गांधीनगरहून मुंबईला जात होती. घटनेनंतर ट्रेन जवळपास १० मिनिटं थांबली होती. मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे मोठं नुकसान झालं नाही. फ्रंट कोच म्हणजेच ड्रायव्हर कोचच्या पुढच्या भागाचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. 

 

 

वतवा रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या आरपीएफ जवान प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश आणि संपत्तीचं नुकसान करण्यासंदर्भातील हा गुन्हा आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेसला अपघाताला सामोरं जावं लागल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वे ट्रॅकवर जनावरांशी धडक होण्याची शक्यता लक्षात घेऊनच सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचं डिझाइन करण्यात आलं होतं, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. 

 

 

याआधी कालही वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. म्हशींच्या कळपाची वंदे भारत एक्स्प्रेसशी धडक झाली होती. वटवा आणि मणिनगर स्टेशनच्या जवळ ही घटना घडली होती. अपघातात वंदे भारत एक्स्प्रेसच्या समोरच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि याचे फोटोही सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाले. या घटनेनंतर २० मिनिटं एक्स्पेस खोळंबली होती आणि यात ४ म्हशींचा मृत्यू देखील झाला होता. 
 

Advertisement

Advertisement