बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले. पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते.
अरुण बाली यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाचा गंभीर आजार झाला होता. यात नसा आणि स्नायू यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा अडथळा निर्माण होतो. या आजारामुळे ते त्रस्त होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना यासंदर्भात रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण आज मुंबईत पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते याबाबत शोक व्यक्त करताना दिसत आहेत.