थायलंडच्या एका चाईल्ड सेंटरमध्ये भीषण घटना घडली आहे. लहान मुलांच्या या केंद्रात प्रचंड गोळीबार झाला असून यामध्ये कमीतकमी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. देशाच्या ईशान्येकडील प्रांतात हा गोळीबार झाल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले आहे.
गुरुवारी देशातील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील लहान मुलांना सांभाळणाऱ्या डे-केअर सेंटरवर हा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर बँकॉकची लायसन्स प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून पळून गेला. कारचा नंबर 6499 सांगितला जात आहे. या क्रमांकाचे पिकअप वाहन कोणी पाहिले असल्यास 192 वर फोन करून माहिती द्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
रॉयटर्सनुसार हल्लेखोर हा माजी पोलीस अधिकारी आहे. त्याचा शोध सुरु असून या घटनेनंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी सर्व यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. थायलंडमध्ये इतर देशांच्या तुलनेत परवानाधारक बंदुक धारकांची संख्या जास्त आहे. यापूर्वी 2020 मध्येही असाच गोळीबार झाला होता. यामध्ये मालमत्तेच्या व्यवहारातून संतापलेल्या सैनिकाने 29 लोकांना गोळ्या घालून ठार केले होते. तर 57 लोक जखमी झाले होते.