गेवराई दि.३ (प्रतिनिधी)-तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्तीवर विद्युत तारेचा शॉक लागून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि.३) दुपारी घडली आहे.महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.ललीता श्रीकांत राठोड (वय-३०) अभिजीत श्रीकांत राठोड (वय-८), प्रशांत श्रीकांत राठोड (वय-११) अशी मृतांची नावे आहेत.
ललिता राठोड या दोन्ही मुलांसह शनिवारी दुपारी भेंडटाकळी तांडा शिवारातील आपल्या शेतात गेल्या होत्या. खेळत असताना दोन्ही मुलांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. दोघेही विजेचा धक्का बसल्याने कोसळल्याचे पाहून आई ललिता त्यांना वाचविण्यासाठी धावली. मात्र, त्यांना देखील विद्युत धक्का बसला. यात तिघांचाही मृत्यु झाला. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.