Advertisement

वारसा संघर्षाचा

प्रजापत्र | Tuesday, 26/07/2022
बातमी शेअर करा

संजय मालाणी
त्यांचा राजकारण प्रवेश भलेही सहज झाला असेल पण सुरूवातीची काही वर्ष सोडली तर राजकारणात त्यांना सातत्याने स्वत:ला सिध्द करावं लागलं. इतकच नव्हे तर प्रत्येक वळणावर कधी स्वकीयांशी, कधी विरोधकांशी झगडावं लागलं. आपल्यावर प्रचंड प्रेम करणार्‍या जनतेच्या भावनांचा विचार करताना कधी प्रचंड दडपणही आलं, तर कधी भावनेच्या पलिकडे जाऊन कठोर निर्णयही घ्यावे लागले. गोपीनाथ मुंडेंची उंची फार मोठी होती त्या उंचीसोबत होणारी तुलना आणि मग ती तुलना सार्थ ठरविण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत हा ही संघर्ष त्यांना टळला नाही. सातत्याने संघर्षाचाच वारसा पुढे न्यावं लागणारं व्यक्तीमत्व म्हणजे पंकजा मुंडे.
राजकारणातल्या भली मोठी उंची असलेल्या व्यक्तीची मुलगी म्हणून त्या राजकारणात आल्या. त्यावेळी त्यांना सारं काही ‘वडिलांच्या पुण्याईमुळे’ मिळतंय असाच सूर होता. स्वत: पंकजा मुंडेंचाही सुरूवातीचा राजकीय प्रवास ‘सांगे वडिलांची किर्ती’ याच धाटणीतला होता. पण हे सर्व होत असताना गोपीनाथ मुंडेंच्या हयातीतच स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं आव्हान पंकजा मुंडेंसमोर होतं. पंकजांना गोपीनाथ मुंडे या नावाचा मोठा आधार होता. गोपीनाथ मुंडे या नावामुळं मिळालेला गर्दीचा वारसाही होता. पण हे होतं म्हणून त्यांचा सारा राजकीय प्रवास फारच अलगद झाला असं नाही. अनेकांना पंकजांना सुरूवातीच्या काळात सहज मिळालेल्या राजकीय प्रतिष्ठेची असूया वाटू शकते. मात्र या सहजपणामध्येही त्यांना अनेक गोष्टीचा त्याग करावा लागला होता. याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही. घरातच पडलेल्या दुफळीनंतरच्या जिल्हा परिषद निवडणूकीत सिरसाळ्यामध्ये घडलेला प्रकार आणि त्यानंतर डोक्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत लाडक्या मुलीला पाहताना गोपीनाथ मुंडेंची झालेली अवस्था आणि तशाही परिस्थितीत हळव्या वडिलांना सांभाळताना पंकजा मुंडेंच्या जीवाची झालेली घालमेल शब्दात मांडता येईलही कदाचित पण भावनांचा तो संघर्ष अनुभवांच्या पलिकडचा असतो. तो संघर्ष ही पंकजांच्या राजकीय जीवनाची खर्‍या अर्थाने सुरूवात होती आणि त्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या वळणांवर असाच वेगवेगळा संघर्ष पंकजा मुंडे करत आल्या आहेत.
गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची यंत्रणा सांभाळत रात्रीचा दिवस करणार्‍या पंकजा मुंडे जिल्ह्याने नव्हे तर राज्याने अनुभवल्या आहेत. गोपीनाथराव तर त्या निवडणुकीत पंकजांना स्वत:चा सेनापती म्हणायचे. त्या काळात गोपीनाथरावांच्या प्रचाराची धुरा सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती. तुलनेनं राजकारणात नवख्या असलेल्या पंकजा मुंडेंसाठी ती निवडणूक म्हणजे फार मोठं आव्हान होतं पण ते आव्हान त्यांनी लिलया पेललं. त्यामुळेच ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणी झाली आणि मतमोजणी केंद्रावरच गोपीनाथरावांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या लेकीचं केलेलं कौतुक पंकजा मुंडेंच्या पुढच्या राजकीय भवितव्याबद्दल खूप काही सांगणारं होतं.
त्यानंतरही अनेक अत्यंत कठोर म्हणावे असे क्षण पंकजा मुंडेंना अनुभवावे लागले. गोपीनाथरावांच्या अकाली जाण्यानं कुटुंबाला बसलेल्या धक्क्यातून स्वत:ला सावरतानाच राज्यभरातील मुंडे समर्थकांच्या मनात निर्माण झालेल्या अनाथपणाच्या भावनेला दूर करणं हा देखील फार मोठा भावनिक संघर्ष होता.  त्या क्षणापर्यंत प्रचंड हळव्या असलेल्या आणि गोपीनाथ मुंडेंच्या आयुष्यातील अत्यंत हळवा कोपरा असलेल्या पंकजा मुंडेसारख्या व्यक्तीला त्यावेळी कोणत्या भावनांना तोंड द्यावं लागलं असेल याची कल्पना सहजासहजी करवत नाही. मात्र त्यानंतर लगेचच पंकजा मुंडेंनी राज्यभरात काढलेली संघर्षयात्रा ही खर्‍या अर्थानं गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा वारसा त्यांच्यात आहे हेच दाखविणारी होती.
त्यानंतरच्या राजकारणात पंकजांना मंत्रीपद मिळालं, त्यानंतरच्या काळात विधानसभेत त्यांचा पराभव झाला त्याच्याच अगोदर भगवान भक्तीगडाचा कठोर निर्णय त्यांना घ्यावा लागला. नंतरच्या काळात पक्षीय राजकारणात त्यांना अनेक चढउतार आजही अनुभवावे लागत आहेत. या प्रत्येक प्रसंगात जणूकाही आता पंकजा मुंडेंचं राजकारणच संपलं असं वाटावं असं चित्र वारंवार निर्माण झालं, केलं गेलं. त्या प्रत्येक प्रसंगातून पंकजा मुंडे तावून सुलाखून निघाल्या आहेत. कधी पंकजांनी आक्रमक वाघीणीची भूमिका घेतली, कधी त्या आता काहीतरी वेगळा निर्णय घेतील असं वाटत असतानाच त्यांनी अचानक तलवार म्यान करणारी संयमाची भूमिकाही घेतली. कधी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांचं काय होईल असाही प्रश्‍न अनेकांना पडायचा. त्या प्रश्‍नांनाही पंकजांनी सातत्याने उत्तरं दिली आहेत. राजकारणातलं धक्कातंत्र आता पंकजा मुंडेंनीही बर्‍यापैकी अवगत केलं आहे.
पंकजा मुंडेंच्या स्वभावाबद्दल टीका होते, त्यात तथ्य नाही असंही म्हणता येणार नाही. ज्यांची उंची मोठी असते त्यांच्याकडूनच सामान्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि मग अशांच्याच बाबतीत अपेक्षाभंगाचं दु:खही होतं. त्या दु:खाची राजकीय किंमतही पंकजा मुंडेंना चुकवावी लागली आहे. पण हे सर्व असलं तरी, त्या परळीपेक्षा वरळीत जास्त असतात अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केलेली असली तरी त्यांच्या कामाबद्दल, बीडच्या पालकमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या  सर्वसमावेशक भूमिकेबद्दल कोणाच्या मनात दुमत नसतं. राजकारणी व्यक्ती राजकारण करणारच, राजकारणातील शह काटशह पंकजा मुंडेंनी दिले नाहीत असं नाही पण या सर्वांच्या पलिकडे जाऊन जिथे सामान्य माणसाचा विषय येतो, ज्या सामान्याला कोणत्याच राजकारण्याकडून थेट कोणताच लाभ घ्यायचाच नसतो तो सामान्य माणूस मात्र आजही पंकजा मुंडेंसाठी दिवस दिवस वाट पहायला तयार असतो. त्याला पंकजा मुंडेंकडे कोणतं पद आहे याच्याशी देणं घेणं नसतं. गाव खेड्यातल्या महिला आजही पंकजा मुंडे समोर आल्या तर त्यांच्या गालावरून हात फिरवून स्वत:चा गालावर बोट मोडतात. ही आपुलकी आणि हा जिव्हाळा ही खर्‍या अर्थानं पंकजा मुंडेंची शक्ती आहे. ती शक्ती संघर्षाच्या वारशातून मिळालेली आहे. गोपीनाथरावांनी जो जनतेचा सागर ठिकठिकाणी स्वत:भोवती जोडला होता तोच जनसागर आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागात पंकजा मुंडेंसाठी खर्‍या अर्थानं ऊर्जा आणि प्रेरणास्त्रोत आहे. पंकजा मुंडेंना राज्याच्या कोणत्याही भागात असलेली स्वीकारार्हता आणि राज्याच्या अनेक मतदारसंघामध्ये आजही पंकजा मुंडे या नावाभोवती जमणारी गर्दी हीच महाराष्ट्राच्या राजकारणातली पंकजा मुंडे नावाची राजकीय अपरिहार्यता आहे. मागच्या काही वर्षात पंकजा मुंडेंनी सातत्याने वेगवेगळ्या संघर्षातून, राजकारणातील कटू गोड अनुभव सहन करून स्वत:ला खंबीरपणे उभं ठेवलं आहे. संघर्षातून खंबीरपणे उभे राहण्याचा हा वारसा तसा गोपीनाथरावांचाच. तोच वारसा, गोपीनाथराव, प्रमोद महाजन या जोडीचा ठामपणे उभे राहण्याचा गुण घेवून पंकजा मुंडे पुढे जात आहेत. त्यांनी अधिकाधिक जनताभिमूख व्हावं याच त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

Advertisement

Advertisement