Advertisement

परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत वाण धरण तुडुंब

प्रजापत्र | Wednesday, 13/07/2022
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ (प्रतीनिधी)÷परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील नागापूर येथील ‘वाण प्रकल्पाचा’ १०० टक्के जलसाठा झाला आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज (दि.१३) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.

 

परळी तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. गेल्या आठवड्यात धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत झाली.

 

परळी तालुक्यातील बोरणा, बोधेगाव या मध्यमतलावातही मोठ्या प्रमाणात पाणी साठवण सुरू आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या तालुक्यातील नागापूर येथील ‘वाण प्रकल्पाचा’ १०० टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. तालुक्यातील लघुतलावात पाणीसाठा समाधानकारक आहे.

 

परळी तालुक्यातील वाण धरण भरण्यासाठी धरणाला वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवश्यकता होती. धारुर, केज, अंबाजोगाईच्या क्षेत्रात होणाऱ्या पावसावर या धरणातील पाणी साठ्याची भिस्त आहे. गेल्या तीन दिवसांत मोठे पाउस या क्षेत्रात झाले. त्यामुळे वाण धरणात मुबलक पाणी साठा निर्माण झाला आहे.
 

Advertisement

Advertisement