मुंबई : नुकतीच भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयी संघाचा भाग असलेला राजवर्धन हंगरगेकर मोठ्या वादात सापडला आहे. राजवर्धनवर वय लपवल्याचा आरोप करण्यात येत आहे. माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, राजवर्धन हंगरगेकरचे खरे वय २१ वर्षे आहे, पण तो नुकत्याच झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात खेळला होता. या वेगवान गोलंदाजाने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. तसेच फलंदाजीतही कमाल केली. आणि भारताने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव केला.
महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवक व्यवहार आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धन यांच्यावर वयाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. या आयएएस अधिकाऱ्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पत्रही लिहिले आहे. आणि काही कथित पुरावेही सुपूर्द केले आहेत.
'सामना' या मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनीही राजवर्धन हंगरगेकर याच्याही खऱ्या वयाबाबतची पुष्टी केली आहे. राजवर्धन हा तेरणा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शाळेच्या नोंदीनुसार हंगरगेकर यांची खरी जन्मतारीख १० जानेवारी २००१ होती. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत हीच जन्मतारीख होती, पण ८वीला प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी त्यात बदल करून जन्मतारीख १० नोव्हेंबर २००२ अशी केली होती. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान या वेगवान गोलंदाजाचे वय २१ वर्षे होते.
चेन्नईने दीड कोटी रुपयांना विकत घेतले
राजवर्धनने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेमध्ये पाच बळी घेतले आहेत. यासोबतच त्याने फलंदाजीतही उपयुक्त कामगिरी केली. त्याने आयर्लंडविरुद्ध १७ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला दीड कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. जर राज्यवर्धनेन ही गोष्ट केली असेल तर त्याला कडक शासन होऊ शकते. कदाचित त्याला काही काळासाठी निलंबितही केले जाऊ शकते.