गेवराई- तालुक्यात अवैध वाळू तस्करीने आणखी एका जणाचा बळी घेतला आहे. गोदापात्रात केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करताना एका मजूर तरुणाचा डोक्यात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. हि घटना आज दुपारी तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. राजेंद्र शिंदे (वय 32) रा.खेर्डा ता.पैठण जि.औरंगाबाद असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा हा गंभीर विषय बनला आहे. गोदावरीतून दिवस-रात्र वाळू उपसा करुन ती खुलेआम वाहतूक केली जाते. हि वाळू घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाने यापूर्वी अनेकांना चिरडले आहे. गत महिण्यातच राक्षसभुवन फाटा येथे खामगाव येथील एका दुचाकीस्वाराला वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रक्टरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. यानंतर संतप्त ग्रामस्थांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात चार तास ठिय्या मांडून आंदोलन छेडले होते. दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची समजून काढून वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यानंतर देखील तालुक्यातील अवैध वाळू उपसा काही केल्या बंद झालेला नाही. दिवस-रात्र वाळू उपसा सुरुच असून आज पुन्हा एक तरुणाचा बळी या अवैध वाळू लाहतुकीने घेतल्याने खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी शुक्रवार दि.4 फेब्रुवारी रोजी दुपारी गोदावरी नदीच्या पात्रातून केनीच्या सहाय्याने वाळू उपसा करत असताना अशोक शिंदे या मजूर तरुणाचा केनीचा दांडा तुटून डोक्यात लागल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान यानंतर काही वाळू तस्करांनी शिंदे या तरुणाचा मृतदेह उमापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करुन पळ काढला असल्याचे सांगितले जाते. तर माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे, चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि भास्कर नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पाहणी केली आहे. उमापूर शासकीय रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
ती केनी कोणात्या वाळू माफीयाची, गुन्हा दाखल होणार का ?
मयत तरुण हा पैठण तालुक्यातील खेर्डा येथील रहिवासी आहे. तो राक्षसभुवन येथील एका वाळू तस्कराच्या केनीवर वाळू उपसा करण्यासाठी मजूर म्हणून कामाला होता. दरम्यान त्याचा वाळू उपसा करताना मृत्यू झाला असून एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदरील वाळू उपसा करणारी केनी कोणत्या वाळू तस्कराची आहे ? त्याचावर महसूल व पोलिस प्रशासन काय कारवाई करणार ? त्याचावर गुन्हा दाखल होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.