Advertisement

बुलेट चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

प्रजापत्र | Saturday, 29/01/2022
बातमी शेअर करा

गेवराई-नव्या कोर्‍याकट बुलेट चोरणार्‍या टोळीचा गेवराई डीबी पथकाने पर्दाफाश केला असून तालुक्यातील राक्षसभुवन येथून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्यांच्याकडून पाच बुलेट, एक पल्सर आणि एक एचएफ डिलक्स अशा सात गाड्या पथकाने जप्त केल्या. ही कारवाई डीबी पथकाचे प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे व त्यांच्या पथकाने केली.
       जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यातच चोरट्यांनी महागड्या बुलेट चोरीकडे आपला मोर्चा वळवला होता. दरम्यान, येथील पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरु केला असता तालुक्यातील राक्षसभुवन येथे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी छापा टाकला असता येथे पाच बुलेट आणि इतर दोन दुचाकी मिळून आल्या. पोलिसांनी कारवाई करत सोमनाथ रामदास खटाले (वय २८, रा.खटालेवाडी ता.आष्टी जि.बीड) व संदिप दिलीप कदम (वय २७, रा.डोंगरगाव ता.जि.अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये एक काळ्या रंगाची विना नंबरची एक बुलेट, एम.एच.१२ एन.९८८८, एम.एच.१७ सी.के.११९९, एम.एच.१७ बीके ७३८४, एम.एच.२० ईएम ७९७० अशा पाच बुलेट आणि एम.एच.१८ बी.क्यु ७८८१, एम.एच.२१ बीएन ६७५१ अशा इतर दोन दुचाकींचा समावेश आहे. दोन्ही आरोपींच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, डिवायएसपी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिष वाघ, पोलिस निरीक्षक रविंद्र पेलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथक प्रमुख सपोनि प्रफुल्ल साबळे, पो.विठ्ठल देशमुख, नागरे, पो.जायभाये यांनी केली.

Advertisement

Advertisement