Advertisement

परळीत एसटी कर्मचाऱ्यांचे 'दंडवत'आंदोलन

प्रजापत्र | Monday, 22/11/2021
बातमी शेअर करा

परळी-मागील १८ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतल्याने लालपरी ठप्प आहे.परळीत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचारी कीर्तन, प्रवचन, मुंडण, रक्तदान, पत्र आंदोलन केल्यानंतर सोमवारी (दि.२२) परळीत एसटी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकापासून गणपती मंदिरापर्यंत 'दंडवत' आंदोलन करत सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी केली. 

 

           महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय. परळी वैजनाथ आगारातील कर्मचारी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. कीर्तन, प्रवचन, मुंडण, रक्तदान, पत्र आंदोलन आजपर्यंत करण्यात आले.सोमवारी परळी आगारातील कर्मचाऱ्यांनी दंडवत आंदोलन केले. आंदोलन स्थळापासून श्री गणपती मंदिरापर्यंत कर्मचाऱ्यांनी दंडवत घेऊन शासनाला सुबुद्धी द्यावी असे बुद्धीच्या देवतेला म्हणजेच गणपतीला साकडे घातले. जोपर्यंत राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण करण्यात येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेत कर्मचारी आहेत. गेल्या १८ दिवसांपासून चाललेल्या आंदोलनामुळे परळी आगारातील सर्व वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दररोज ८ लाखांचे उत्पन्न बुडत असून आजवर जवळपास परळी अगराला दीड कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. परळी आगारातून दररोज बसच्या २५० फेऱ्या होत होत्या, मात्र कर्मचारी संपामुळे त्या बंद आहेत. सोमवारी झालेल्या आंदोलनात संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दंडवत आंदोलन केले. शासनाने कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची तळमळ असेल तर लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावून आमचे राज्य शासनात विलिनीकरण करावे असे गणपतीला साकडे घालून प्रार्थना केली.

Advertisement

Advertisement