अफगाणिस्तानात दहशदवादी हल्ले कमी होण्याची काही चिन्ह नाही. शुक्रवारी पुन्हा अफगाणिस्तानात बॉम्ब स्फोट झाला ज्यात किमान 12 लोकं जखमी झाले आहेत, ज्यात स्थानिक मौलवीचाही समावेश आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. पूर्वेकडील नांगरहार प्रांतातील स्पिन घर परिसरात नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये हा स्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.30 वाजता हा स्फोट झाला, असे परिसरातील एका व्यक्तीने अटल शिनवारी यानी सांगितले.
तालिबानच्या एका अधिकाऱ्याने, एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, “स्पिन घर जिल्ह्यातील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटाची पुष्टी झाली आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे इस्लामिक स्टेटचा हात आहे.”
काबूल रुग्णालयाबाहेर स्फोट
याआगेदर, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील लष्कर रुग्णालयासमोर मंगळवारी नागरिकांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. तालिबानचे उप प्रवक्ते बिलाल करीमी यांनी असोसिएटेड प्रेस (एपी) ला सांगितले की, काबुलमधील सरदार मोहम्मद दाऊद खान मिलिटरी हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांना लक्ष्य करणारा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. इस्लामिक स्टेटच्या सैनिकांनी रुग्णालयाबाहेरही गोळीबार केला. 15 मिनिटांत गोळीबारानंतर, हल्लेखोऱ्यांचा खातमा करण्यात आला.
ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीत स्फोट
उत्तर अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम मशिदीत 8 ऑक्टोबरला झालेल्या स्फोटात किमान 46 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले. इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने मशिदीवरील बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या आत्मघाती हल्लेखोराने ही घटना घडवून आणल्याचे सांगितले. कुंदुझ प्रांतातील मशिदीत दुपारी नमाजाच्यावेळी स्फोट झाला होता. काही तासांनंतर आयएसशी संलग्न असलेल्या अमाक वृत्तसंस्थेने दावा केला की, आयएसने आत्मघाती बॉम्बरची ओळख उइघुर मुस्लिम म्हणून केली आणि म्हटले की हा हल्ला शिया आणि तालिबान दोघांनाहीसाठी होता.