राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी शनिवारी अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीने त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली.
मनी लाँड्रिंग प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अटक केली.
मनी लाँड्रिंग प्रकरण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीशी संबंधित आहे. मुंबई पोलिसांचे बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांनीही देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. मुंबईच्या तळोजा कारागृहात बंद असलेले वाझे हे सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्या कोठडीतही 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तेही 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे.