नवी दिल्ली - गुजरातमध्ये पोलीस स्टेशन परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री लागलेल्या आगीत तब्बल 25 वाहने जळून खाक झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा शहरातील पोलीस स्टेशनच्या परिसरात रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. आग लागलेल्या वाहनांमध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा आणि काही कारचा समावेश आहे. परिसरात प्रचंड धूर आणि आगीचे लोट पाहायला मिळाले.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणातच सर्वच्या सर्व वाहनांनी पेट घेतला आणि सर्व गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.